नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागल्यानंतर घराकडे निघालेले शेतकरी पुन्हा गाझीपूर सीमेवर परत येऊ लागले असून काल मध्य रात्रीपासूनच शेतकऱ्यांचे लोंढे दिल्लीच्या सीमेवर एकवटू लागल्यामुळे गाझीपूर सीमा पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. त्याला कारण ठरले भारतीय किसान युनियनचे नेत राकेश टिकैत यांना काल रात्री अनावर झालेले अश्रू!
ट्रॅक्टर परेड हिंसाचारानंतर ६३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शांततेत धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था द्विधा झाली होती. त्यातच उत्तर प्रदेश प्रशासनाने दिल्लीच्या सीमेवरील विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठाही बंद केला होता आणि सीमा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.
हेही वाचाः राष्ट्रपती म्हणाले, प्रत्येक आंदोलनाचा सन्मान, परंतु प्रजासत्ताक दिनाचा अपमान दुर्दैवी!
पोलिसांनी अनेक ठिकाणच्या आंदोलकांना पिटाळून लावण्याचाही प्रयत्न केला होता. गाझीपूर सीमेवर काल गुरूवारी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करून रात्री बारावाजेपर्यंत ही सीमा खाली करण्याचे आदेश आंदोलकांना देण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरची वाट धरली होती.
हेही वाचाः गाझीपूर सीमेवर पोलिस क्रॅकडाऊनच्या तयारीत, अन्याय केल्यास आत्महत्येची टिकैत यांची धमकी
शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रशासन शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. शेतकऱ्यांच्या हत्या केल्या जाण्याचीही शक्यता आहे. परंतु तीन कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. हवे तर आम्हाला अटक करा. आता गावाकडून आल्याशिवाय पाणीही पिणार नाही, असे सांगत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कालपासून उपोषण सुरू केले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
भावनाविवश झालेल्या टिकैत यांना टीव्हीवर या अवस्थेत पाहून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार केला आहे. त्यामुळे घराच्या दिशेने निघालेले शेतकरी मध्यरात्रीपासून पुन्हा गाझीपूर सीमेवर धडकू लागले आहेत. आज पहाटे तीन वाजेपासून त्यात आणखी भर पडली असून शेतकऱ्यांचे लोंढे गाझीपूरला येऊ लागले आहेत. त्यामुळे येथे कमी झालेली गर्दी पुन्हा वाढू लागली आहे.
आंदोलन स्थळे रिकामी करण्याचा आदेश देत उत्तर प्रदेश प्रशासनाने शेतकऱ्यांना काल रात्रीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. गाझीपूर सीमेवर पोलिसांनी फ्लॅग मार्चही केला होता. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक शेतकरी ट्रॅक्टरमध्ये सामान भरून घराच्या दिशेने निघाले होते. येथील लंगरही बंद करण्यात आला होता. मात्र आज पहाटेपासून गाझीपूर सीमेवरील गर्दी पुन्हा वाढू लागली असून लंगरही पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन संपणार, शेतकरी नेत्यांना अटक होणार, अशी चर्चा काल रात्री आठ वाजेपासूनच सुरू झाली होती. मात्र मध्यरात्रीपासून गाझीपूर सीमेवर पुन्हा शेतकऱ्यांची गर्दी वाढत असलेली पाहून तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी काढता पाय घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनीही रात्रीच आंदोलनस्थळ सोडले आहे.