ट्रॅक्टर परेड हिंसाचारः मेधा पाटकर, योगेंद्र यादवांसह तब्बल ३७ शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल

0
51
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराला जबाबदार धरून सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनच्या हरियाणा विभागाचे अध्यक्ष गुरनामसिंग चढूनी यांच्यासह तब्बल ३७ शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मोदी सरकारने लागू केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेने आंदोलन करत होते. याच आंदोलनाचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला मात्र हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्यात तोडफोड करत किल्ल्याच्या तटबंदीवर झेंडे फडकावले होते.

या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आता गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. या हिंसाचाराला पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरले असून जय किसान आंदोलनाचे नेत अविका साहा, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत, दर्शनपाल सिंग, सतनामसिंग पन्नू, भूटासिंग बुर्जगिल आणि जोगिंदरसिंग उघरान यांचीही नावे एफआयआरमध्ये आहेत.

भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये या शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दंगल भडकवणे (भादंवि कलम १४७,१४८), गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे (भादंवि कलम १२०ब), खूनाचा प्रयत्न करणे (भादंवि कलम ३०७) अशी कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात ३९४ पोलिस जखमी झाले आहेत. आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतले आहे.

लाल किल्ल्यात पोलिसांची एक गोळी देखील का चालली नाही?: दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराला पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली बरीचशी यशस्वी ठरली. जर कोणती घटना घडली आहे तर त्याला पोलिस प्रशासन जबाबदार आहे. कुणी लाल किल्ल्यावर पोहोचते आणि पोलिसांची एक गोळी देखील चालत नाही. हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र होते. शेतकरी आंदोलन सुरूच राहील, असेही टिकैत यांनी म्हटले आहे.

संसदेवरील मोर्चा रद्दः दिल्लीत घडलेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडली असून दोन शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करावयाच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा