शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला, राज्याच्या २१ जिल्ह्यांतील शेतकरी आझाद मैदानावर एकवटले!

0
145

मुंबईः मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरी संघटना एकवटल्या असून राज्याच्या २१ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानावर धडकले आहेत. नाशिकहून १५ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पायपीट करत मुंबईत दाखल झाले आहेत. हे शेतकरी मुंबईत महामुक्काम आंदोलन करणार आहेत.

  दिल्लीच्या सीमेवर गेल्या ५९ दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसलेले आहेत. चर्चेच्या ११ फेऱ्या होऊनही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. हे तिन्ही कृषी कायदे रद्द करा, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. या कायद्यांमुळे शेती आणि शेतकरी कॉर्पोरेटच्या कब्जात जाईल, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. परंतु मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे.

आता आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरीही एकवटले आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यातील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचत आहेत. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहेत. नाशिकहून भारतीय किनास सभेच्या नेतृत्वात १५ हजारांहून अधिक शेतकरी पायपीट करत निघाले होते. ते आझाद मैदानावर धडकले आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उद्या, सोमवारी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही शेतकऱ्यांशी संवाद साधतील, असे सांगितले जात आहे.

आंदोलक शेतकरी आझाद मैदानावर तीन दिवस आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना कोणतीही आडकाठी येऊ नये, याची खबरदारी सरकारकडून घेतली जात आहे.

या आंदोलनादरम्यान राजभवनावरही मोर्चा काढला जाणार असून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राज्यपालांना निवेदन देणार आहेत. आझाद मैदानावर भव्य मंचही उभारण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सहभागी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारचेच बळ मिळाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा