भीमा- कोरेगाव: सत्य बाहेर येण्याच्या धास्तीनेच केंद्राने तपास एनआयएकडे सोपवलाः शरद पवार

0
193
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भीमा कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषद प्रकरणातील सत्य बाहेर येईल, या धास्तीनेच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे ( एनआयए) सोपवला असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या एकूणच प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 अन्याय- अत्याचारावर बोलणे म्हणजे नक्षलवाद नव्हे, असे सांगत न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणात अनेकांना नक्षलवादी ठरवून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनात अटक केलेल्यांना माओवादी किंवा नक्षलवादी संबोधले नव्हते, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

 एल्गार परिषदेत नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा कविता संग्रहातील कविता वाचण्यात आली होती. त्या कवितेत अन्याय- अत्याचाराविरोधात आग लावण्याची भाषा होती. गोलपीठा कविता संग्रहाला राज्य सरकारने पुरस्कार दिला होता. याच कविता संग्रहासाठी ढसाळांना केंद्र सरकारने पद्मश्री दिली होती. त्यातील कविता वाचणाऱ्याना लगेच माओवादी, नक्षलवादी ठरवून अटक करणे योग्य नाही, असेही पवार म्हणाले.

 कायदा व सुव्यवस्था हा राज्य सरकारचा अधिकार आहे. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही., असे पवार म्हणाले. भीमा-कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषद प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. या पत्रानंतर काही तासांतच केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. त्यावर शरद पवारांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, या भीतीपोटीच केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा