इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु होणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

0
470
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मागच्या वर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आलेल्या शाळा आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २७ जानेवारीपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यापासून टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट सुरू केली जात आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचना या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली.

 या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळांत इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवावारीपासून कोरोनासंबंधी सर्व खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

२० जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा विचारः दरम्यान, ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील महाविद्यालये २० जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. फेसबुक लाइव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. येत्या काही दिवसांत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महाविद्यालये, वसतिगृहांबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून २० जानेवारीपासून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करता येतील का, याबाबतची चाचपणी केली जाईल, असे सामंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा