देवासाठी तरी आता काही ठोस पावले उचलाः अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर पतीचेच टिकास्त्र

0
536
संग्रहित छायाचित्र.

हैदराबादः देशाच्या अर्थव्यवस्थेला गटागंळ्या खात असून हे सगळे देवामुळे म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’मुळे घडत असल्याचे संपूर्ण देशाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करत असल्या तरी त्यांचे पतीच त्यांच्याशी सहमत नाहीत. त्यांचे पती परकाल प्रभाकर यांनी सीतारमण यांच्यावर कडाडून टिका केली आहे. आता तरी देवाच्या नावाने काही ठोस पावले उचला, असे प्रभाकर यांनी म्हटले असून पत्नीच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे.

अर्थव्यवस्थेला घरघर लागण्यास मोदी सरकार जबाबदार आहे, असे पराकल प्रभाकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या पत्नी निर्मला सीतारमण मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. खरा ऍक्ट ऑफ गॉड तर सूक्ष्म आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोणतेही ठोस धोरण नसणे हेच आहे. कोविड तर नंतर आला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये जी गोष्ट मी सांगितली होती आणि सरकार त्याचा इन्कार करत होते, ती अर्थव्यवस्था  उणे २३.९ टक्क्यांनी आक्रसल्यामुळे सिद्ध झाली आहे. देवासाठी किमान आता तरी काही करा!, असे प्रभाकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रभाकर यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये द हिंदूमध्ये एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली होती आणि काही महत्वाच्या सूचनाही केल्या होत्या.

सत्ताधारी भाजपकडे अर्थव्यवस्थेच्या संदर्भात कोणताही स्पष्ट दृष्टिकोन नाही. ते विरोधासाठी विरोध म्हणून नेहरूवादी मॉडेलला विरोध करतात. परंतु त्यांच्याकडे स्वतःचे असे कोणतेही मॉडेल नाही आणि कोणता विचारही नाही, असे प्रभाकर यांनी या लेखात म्हटले होते.

अर्थव्यवस्थेला लागलेल्या घरघरीला देवच जबाबदार असल्याचे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वतःची आणि सरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्क्यांवर घसरण्याच्या दोन दिवसआधी सीतारमण यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोरोनामुळे जीएसटीचा महसूल कमी आहे आणि हा ऍक्ट ऑफ गॉड आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर चोहोबाजूंनी सडकून टीका झाली होती. आता खुद्द त्यांच्या पतीनेच त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा