अभिनेत्री कंगनाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने एफआयआर दाखल, अटकेचीही शक्यता

0
96
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना रणौत आणि आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कंगनाला अटक होण्याचीही शक्यता असून यानिमित्ताने तिच्या ड्रग्ज कनेक्शनचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. विशेष कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच केलेली आहे.

कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल या दोघी हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूने वारंवार ट्विट करत असल्याच्या आरोपांप्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व तिच्या बहिणीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी अॅड. रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्विट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांनी कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ न्यायालयात पुरावे म्हणून सादर केले आहेत. त्यानंतर न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गंत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते.

मुख्यमंत्री ठाकरेंचाही केला होता एकेरी उल्लेखः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाने एकेरी उल्लेख केला होता. मुंबई, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दलही तिने आक्षेपार्ह विधाने केली होती. तिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यावरून मोठे वादळ उठले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तिच्या अडचणी वाढणार आहेत.

वांद्रे पोलिसांनी दिला होता गुन्हा दाखल करण्यास नकारः याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी न्यायालयात करण्यात आला.

कंगनाची मग्रुरी कायम, पुन्हा पप्पू सेना उल्लेखः मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतरही कंगनाची मग्रुरी काही कमी झालेली नाही. नवरात्रीचं व्रत कोण कोण करतेय? मी सुद्धा हे व्रत करत आहे. या सर्वात माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाहीय. मला जास्त मिस करताय तर मी लवकरच तिथे परतत आहे, असे ट्विट कंगनाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा