फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

0
177
संग्रहित छायाचित्र.

पुणेः बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता रश्मी शुल्का चांगल्याच अडचणीत सापडणार आहेत.

 पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडगार्डन पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात भारतीय तार अधिनियमनच्या कलम २६ नुसार एफआयआर दाखल केला आहे.

 रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला या २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कार्यरत होत्या. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे.

शुक्ला यांनी तत्कालीन पोलिस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च २०२१ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. २०२१ च्या पावसाळी अधिवेशनात याच अहवालावरून रणकंदन माजले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्ला यांच्या गोपनीय अहवालातील माहिती उघड केली होती. रश्मी शुक्ला यांनीच अहवाल फोडून फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप तेव्हा काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंग करण्यात आले होते का? याची पडताळणी करण्यास चौकशी समितीला सांगण्यात आले होते. त्यानुसार चौकशी समितीने पडताळणी केली असून रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या काळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 संजय पांडे यांच्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे पोलिसांना रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा