लोकविकास बँकेत २२ लाखांचा अपहार, भाजप नेते जे. के. जाधव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

0
535
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः अतिक्रमित जागेचा वाद न्यायालयात सुरू असताना लोकविकास नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजप नेते जे.के. जाधव यांनी खातेदाराच्या खात्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकाशी संगनमत करुन २२ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लखूजी औटी व व्यवस्थापक भगवान डोळे यांचाही समावेश आहे.

सातारा परिसरातील रहिवासी किसन मुरलीधर भादे यांची चिकलठाणा एमआयडीसीत भागीदारीत आनंद इंडस्ट्री या नावाने फर्म होती. भादे यांच्यासोबत ३० सप्टेंबर १९८६ पासून हर्षला एकनाथ जाधव व क्रांती जगन्नाथ जाधव यांची ५१ टक्के भागीदारी होती. आनंद इंडस्ट्रीजच्या नावाने १९९९ मध्ये लोकविकास नागरी सहकारी बँकेत चालू खाते उघडले होते. त्यावेळेस बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिघांच्याही स्वाक्षऱ्यांचे नमुने घेतले होते. आनंद इंडस्ट्रीजचे उत्पादन २०११ पासून बंद असल्यामुळे बँक खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही.

ऑक्टोबर २०१९ मध्ये भादे हे कंपनीच्या मालकीच्या भूखंडावर गेले. त्यावेळी त्यांना तेथे भाडेकरु दिसून आले. त्यांनी विचारणा केली असता त्यांना ही जागा जे. के. जाधव यांनी नियमित १३ हजार ५०० रुपये भाडे तत्त्वावर दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भादे यांनी कंपनीचे कार्यकारी भागीदार हर्षला जाधव यांना प्रकरण सांगितले. तेव्हा हर्षला यांनी कंपनीचा व्यवहार आणि उत्पादन बंद असल्यामुळे त्या खात्यात त्यांनी कोणताही व्यवहार केलेला नाही, असे म्हटल्यावर भादे यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवून कंपनीचे खाते कोण चालवत आहे, याबाबत माहिती मागवली. पण बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधव असल्यामुळे त्यांच्या दबावासमोर बँकेने कोणतीही माहिती दिली नाही.

असा केला गैरव्यवहारः जे. के. जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी बँकेला पत्र देत त्यासोबत बनावट दस्तावेज तयार केला. या पत्रासोबत आनंद इंडस्ट्रीजचे बनावट उद्यम नोंदणी प्रमाणपत्र सादर केले. बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन आनंद इंडस्ट्रीजच्या स्वाक्ष-यांच्या नमुन्यांचे कार्ड तयार करुन ते खात्यात जमा केले. त्याचे बनावट दस्तावेज खात्याशी जोडण्यात आले. अशाप्रकारे त्रिकुटाने ४ एप्रिल २०१२ ते १७ ऑगस्ट २०२० याकाळात भादे यांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विजय जाधव हे करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा