पिस्तूल सापडल्याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा, करूणा शर्मांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

0
368
संग्रहित छायाचित्र.

बीडः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यासाठी मुंबईहून परळीत आलेल्या करूणा शर्मा यांच्या वाहनात पिस्टूल सापडल्याप्रकरणी त्यांचा वाहनचालक दिलीप पंडित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, करूणा शर्मा यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर वाहनचालक पंडितला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. करूणा शर्मा यांची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

करूणा शर्मा या रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. परळीत आल्यानंतर त्यांनी वैद्यनाथाच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मात्र धनंजय मुंडे समर्थक महिला कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यावेळी करूणा शर्मा आणि मुंडे समर्थक महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परळी शहर पोलिस करूणा शर्मा यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर करूणा शर्मा ज्या इनोव्हा गाडीतून प्रवास करून आल्या होत्या, त्या गाडीची पोलिसांनी झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत गाडीत एक पिस्तूल आढळून आले. विनापरवाना पिस्तल बाळगल्याप्रकरणी करूणा शर्मा यांच्या गाडीचा चालक दिलीप पंडित यांच्याविरुद्ध परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः अपने को तो रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके… ऐका करुणा शर्माची व्हायरल कॉल रेकॉर्डिंग!

विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी करूणा शर्मांच्या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असला तरी हे पिस्तूल सापडून २४ तास उलटून गेले तरी गाडीत आढळलेले हे पिस्तूल कुणाचे? हे कशासाठी आणण्यात आले? याचा शोध परळी पोलिस घेऊ शकले नाहीत. परळीत येऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या घरी जाणार असे करूणा शर्मा यांनी गुरूवारी केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले होते. त्यामुळे बेकायदेशीररित्या पिस्तूल घेऊन करूणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या घरी कोणत्या उद्देशाने जाणार होत्या? त्यांनी प्रवास केलेल्या इनोव्हा गाडीत पिस्तूल आढळूनही केवळ वाहनचालकावरच गुन्हा का दाखल केला? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

हेही वाचाः मंत्री धनंजय मुंडेंभोवती फास टाकायला आल्या, पण स्वतःच ‘अशा’ जाळ्यात अडकल्या करूणा शर्मा!

 दरम्यान, विशाखा रविकांत घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या जिवे मारण्याचा प्रयत्न आणि ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने करूणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर वाहन चालक दिलीप पंडित याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. करूणा शर्मा परळीत आल्यानंतर जो ड्रामा घडला, त्या एकूणच प्रकरणाचा तपास परळी पोलिस कशा प्रकारे करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 दुसरीकडे करूणा शर्मा यांनीही परळी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून करूणा शर्मा यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिसांनी ७० ते ८० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा