परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा, विविध २२ कलमान्वये नोंदवला एफआयआर

0
721
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि होमगार्डचे विद्यमान महासंचालक परमबीर सिंग यांच्याविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलिस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीच वाढ होणार आहे. परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार अकोला पोलिस नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी आधीच केली आहे. आता त्यांच्याच तक्रारीवरून अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अकोला पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा अट्रॉसिटी कायद्याच्या विविध २२ कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना त्यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी आधीच पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. आता त्यांनी परमबीर सिंग यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याची फिर्याद अकोल्याच्या कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून परमबीर सिंग यांच्याह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात अट्रॉसिटी कायद्याच्या विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा