भंडारा रुग्णालयात अग्नितांडव,१० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

0
381

भंडाराः शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसएनसीयूमध्ये एकूण १७ नवजात बालके होती. त्यापैकी ७ बालकांना वाचवण्यात यश आले आहे.

शनिवारी रात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बॉर्न युनिटमधून अचानक धूर निघत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या लक्षात आले. परिचारिकेने दार उघडून बघितले तर सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. परिचारिकेने ही माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाने रुग्णालयात धाव घेऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केले.

रुग्णालयात इन बॉर्न आणि आऊट बॉर्न असे दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.

रुग्णालयाला आग लागली तेव्हा रुग्णालयात अन्य रुग्णही मोठ्या प्रमाणात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली.

आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेशः दरम्यान, या घटनेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शोक व्यक्त केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेची सखोल चौकशी करू. पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेऊ, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा