मुंबईः कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या आणि देणाऱ्या विद्यार्थी- शिक्षकांसाठी दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा १२ ते १६ नोव्हेंबर असे पाच दिवस दिवाळीच्या सुट्या असणार आहेत. याबाबतचा शासन आदेश गुरूवारी जारी करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे घरातूनच ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाही दिवाळीच्या सुट्या मिळतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार हा शासनादेश जारी करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा बंदच आहेत. मात्र १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करून ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. माध्यमिक शाळा संहितेतील नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत आणि एकूण कामकाजाचे २३० दिवस होणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक कामकाजाचे किमान २०० दिवस आणि सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक कामकाजाचे किमान २२० दिवस होणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून यंदा १२ नोव्हेंबर १६ नोव्हेंबर असे पाचच दिवस दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या काळात ऑनलाइन अध्यापन बंद राहील, असे शालेय शिक्षण विभागाने ५ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.
