‘सीरम’मधील आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

0
82

पुणेः कोरोनावरील कोविशील्ड ही लस निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, सीरमने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. ज्या इमारतीला आग लागली, तेथे कोविशील्ड लसीची निर्मिती किंवा साठवणूक होत नव्हती, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी या आगीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे.

पुण्यातील मांजरी भागात सीरम इन्स्टिट्यूट आहे. गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास टर्मिनल १ गेटजवळच असलेल्या बीसीजी लस निर्मिती करणाऱ्या प्लांटच्या इमारतीतून धूर निघायला सुरूवात झाली. तातडीने ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. ज्या ठिकाणी आग लागली ती इमारत सहा मजली आहे. आगीत तीन मजले जळून खाक झाले. इमारतीतून निघणार्‍या धुराचे प्रमाण एवढे प्रचंड होते की त्यामुळे आग विझवण्यातही अडचणी येत होत्या. अग्निशमन दलाच्या १० बंबांच्या साह्याने ही आग विझवण्याचे आणि या आगीत कोणतीही मनुष्यहानी होऊ नये, याचे अटोकाट प्रयत्न करण्यात आले. एनडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली होती. या इमारतीतून सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सुरूवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढले. शंभर टक्के आग विझल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले, तेव्हा मजला जळून खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह तेथे पडल्याचे आढळून आले. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असे मोहोळ म्हणाले. या आगीत मृत्यू झालेले बांधकाम मजूर आहेत.

 सीरमचा मदतीचा हातः सीरमचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना नियमानुसार मिळायची ती रक्कम मिळेलच. मात्र आम्ही प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत प्रत्येकी पाचही मृतांच्या कुटुंबीयांना देत आहोत, असे पुनावाला म्हणाले.

मुख्यमंत्री करणार उद्या पाहणीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशीही ठाकरे यांनी चर्चा केली आहे. उद्या, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री ठाकरे हे सीरमची पाहणी करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा