‘पदवीधर, शिक्षक’ निवडणुकीचे निकाल सांगणार ठाकरे सरकारची लोकप्रियता, भाजपची पत!

0
283
प्रातिनिधिक छायाचित्र.

प्रमिला सुरेश/मुंबई

विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, १ डिसेंबर रोजी  राज्यातील ३६ पैकी २३ जिल्ह्यांत मतदान होणार असून हे पाच मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारची लोकप्रियता आणि हातातून सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपचे जनमानसातील स्थान यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि हे सरकार ‘अनैसर्गिक’ असल्याचे सांगत सुटलेल्या भाजपच्या दृष्टीनेही या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

१ डिसेंबर रोजी पुणे विभागातील दोन आणि नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील एक अशा पाच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. ही विधान परिषदेची व्दैवार्षिक निवडणूक असली तरी या मतदारसंघातील मतदारांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्र पाहता या निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिलेला जनमताचा कौल ठरणार आहेत.

हेही वाचाः केंद्र सरकार निधीच देईनाः अनुसूचित जातीच्या ६० लाख विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती बंद

अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात मतदानः या पाच मतदारसंघात १२ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधान परिषदेच्या या प्रत्येक मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र अनेक जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे क्षेत्रफळ मराठवाड्यातील ७६ तालुके आणि ८ जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात ६० पेक्षा जास्त तालुके आणि पाच जिल्हे आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघ ५ जिल्ह्यांत विस्तारलेला आहे. पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघही ५ जिल्ह्यांत विस्तारलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी तब्बल २३ जिल्ह्यांत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहे. म्हणूनच अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात होत असलेल्या विधान परिषदेच्या पाच मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडी सरकारला दिलेला जनमताचा कौल आणि भाजपचे जनमानसातील स्थान यावर शिक्कामोर्तब करणारे असतील, असे मानले जात आहे.

हेही वाचाः शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे मोदी सरकार, भाजप हैराण; मोठे राजकीय नुकसान होण्याची भीती

निकाल का महत्वाचे, त्याची दोन कारणेः  राजकीय निरीक्षक आणि महाराष्ट्रातील जनतेलाही या निवडणुकीच्या निकालाची कमालीची उत्सुकता आहे. त्याची दोन कारणे आहेत. त्यापैकी एक भिन्न विचारसरणी असलेल्या तीन राजकीय पक्षांची महाविकास आघाडी निवडणुकीत एकत्रित प्रचार करू शकते का? या प्रश्नाचे उत्तर तर महाविकास आघाडीने आधीच देऊन टाकले आहे. तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीत एकदिलाने प्रचार करताना दिसून आले आहेत. ते अहोरात्र मेहनत घेतानाही दिसून आले आहेत. मात्र देशातील माध्यमाच्या दृष्टीने ही बातमी होऊ शकली नाही.

महाराष्ट्रातील जनता आणि राजकीय निरीक्षकांना या निवडणुकीच्या निकाल रस असण्याचे दुसरे एक महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे या निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि विशेषतः कोरोना संकटाचे सरकारने केलेले व्यवस्थापन यावर महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल असेल, असे सर्वांनाच वाटते.

हेही वाचाः पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकः असे करा मतदान, नाही तर मतपत्रिका होईल बाद !

भाजपच्या दाव्यांचा उबग आला का?, त्याचाही फैसलाः या निवडणुकीच्या प्रचारातही भाजपने महाविकास आघाडी सरकार ‘अनैसर्गिक’ असल्याचे आणि पुन्हा भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे दावे केले आहेत. आम्ही विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची वाट पहात आहोत. दोन-तीन महिन्यांत भाजपच सरकार स्थापन करणार आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचारादरम्यान सांगून टाकले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘हे अनैसर्गिक सरकार कोसळताच भाजप सरकार स्थापन करायला तयार आहे,’ असाही दावा केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेला भाजपच्या या दाव्यांचा उबग आला का? कोरोना संकटाच्या काळात भाजपने सरकार अस्थिर करण्याचे वारंवार केलेले प्रयत्न महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडले का? सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आणि चलबिचल झालेल्या भाजपचे जनमानसातील नेमके काय स्थान आहे? यावरही या पाच मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल शिक्कामोर्बत करणारे ठरणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा