मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारची उद्या शक्ती परीक्षा, राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
12
छायाचित्र सौजन्यः विकीपिडीया

भोपाळः माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्या रविवारी बहुमताला सामोरे जाण्यास सांगितले आहे. राज्यपाल टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रावर १४ मार्च अशी तारीख आहे, मात्र हे पत्र अर्ध्या रात्रीनंतर म्हणजेच १५ मार्च लागल्यानंतर कमलनाथ सरकारला पाठवण्यात आले आहे.

सकृतदर्शनी  आपले सरकार अल्पमतात आले आहे, आपल्या सरकारने सभागृहाचा विश्वास गमावलेला आहे, असे राज्यपाल लालजी टंडन यांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. राज्यपाल टंडन यांनी भारतीय संविधनाच्या अनुच्छेद १७४ च्या सहकलम १७५(२) मध्ये निहित आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करून कमलनाथ सरकारला बहुमताला सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत. १६ मार्च रोजी( रविवारी) आपल्या अभिभाषणानंतर बहुमत चाचणीला सामोरे जावे. राज्यपालांनी या पत्रात म्हटले आहे. ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थिती रविवार दिनांक १६ मार्च रोजी होईल आणि ती स्थगित, निलंबित अथवा विलंबित होणार नाही, असे राज्यपाल टंडन यांनी पत्रात म्हटले आहे.

२२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केल्याची माहिती आपल्याला आहे. राजीनामे देणाऱ्या आमदरांनी आपल्या राजीनाम्याची माहिती मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांद्वारे दिली आहे. ते आपण काळजीपूर्वक पाहिले असल्याचेही राज्यपाल या पत्रात नमूद करतात. २२ पैकी ६ आमदारांना पदावरून दूर करण्याच्या आपल्या विनंतीवरून त्यांना मी मंत्रिपदावरून हटवले आहे. ज्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले, त्यांचे आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी शनिवारीच मंजूर केले आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपली भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यांना आमदारांची सुरक्षितता हवी आहे. भाजपचेही शिष्टमंडळ मला १४ मार्च रोजी भेटले आणि राजीनामे देणाऱ्या आमदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले, असेही राज्यपालांनी या पत्रात म्हटले आहे.

मध्य़ प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी आधीपासूनच २ जागा रिक्त आहेत. काँग्रेसच्या सहा आमदारांचे राजीनामे विधानसभाध्यक्षांनी मंजूर केले आहेत. अन्य १६ आमदारांचे राजीनामे प्रलंबित आहेत. त्यात ज्योतिरादित्य शिंदे समर्थक १३ आमदारांचा समावेश आहे.  हे गृहित धरून सध्या सभागृहाची सदस्य संख्या २२२ वर येऊन ठेपते. २२२ संख्येचा विचार केला तर बहुमतासाठी ११२ सदस्य संख्या आवश्यक आहे. भाजपकडे १०७ आमदारांचे संख्याबळ आहे. २२ आमदारांनी साथ सोडल्यानंतर काँग्रेसकडे विधानसभाध्यक्षासह ९२ आमदारांचे संख्याबळ उरले आहे. बसपच्या दोन, सपच्या एक आणि चार अपक्ष आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. ज्या १६ काँग्रेस आमदारांचे राजीनामे मंजूर झाले नाहीत, त्यांची संख्या गृहित धरून तांत्रिकदृष्ट्या कमलनाथ सरकार आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ ११५ वर येऊन ठेपते. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी किती आमदार उपस्थित राहतात, यावरच कमलनाथ सरकारचे भवितव्य ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा