वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?, मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांशी खलबते

0
714
छायाचित्र सौजन्यः twitter/@SanjayDRathods

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे माहिती समोर येत असून वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी या विषयावर शिवसेना नेत्यांची खलबते सुरू आहेत.

बीडची तरूणी पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला आघाडीने आजच राज्यभर आंदोलन केले आहे. येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनापूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सांगण्यात येते. सरकारची प्रतिमा जपण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा