माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हाय कोर्टात धाव, सीबीआयचा एफआयआर रद्द करण्याची मागणी

0
46
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सीबीआयने दाखल केलेला भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट केल्याचा एफआयआर रद्द करण्यात  यावा, अशी मागणी करणारी याचिका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी स्फोटके असलेली स्कॉर्पिओ आढळून आल्यानंतर निष्क्रियतेचा ठपका ठेवून मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. बदली केल्याच्या तीन दिवसांनंतर परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्रावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर परमबीर सिंग आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात गेले. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांच्या याचिका निकाली निघाल्या. जयश्री पाटील यांच्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. पंधरा दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याची मुदतही दिली होती.

सीबीआयने प्राथमिक चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट केल्याचा एफआयआर नोंदवला आणि त्यांच्या मुंबई व नागपूर येथील निवासस्थानी छापे मारले होते.

आता अनिल देशमुखांनी सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून अटकेपासून अंतरिम संरक्षणही मागितले आहे. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंगाच्या याचिकेवर उद्या सुनावणीः दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या चौकशीला आव्हान देणारी याचिका मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड महासंचालक परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यांच्या याचिकेवर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा