माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण, मैत्रिणीचाही विनयभंग; पुण्यात गुन्हा दाखल

0
1962
संग्रहित छायाचित्र.

पुणेः कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचाही विनयभंग करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्याच्या चतुःशृगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या ३७ वर्षीय मैत्रिणीने फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, तक्रारदारांनी औंध परिसरात कार पार्क केली होती. कारचा दरवाजा उघडला असता पाठीमागून अजय चढ्ढा आणि ममता चढ्ढा यांनी धडक दिली. त्यानंतर मोठ्याने ओरडून तक्रारदारांना शिविगाळ केली. अजय चढ्ढा यांनी जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग करून थोबाडीत मारली. त्यानंतर तक्रारदार आणि जाधव औंध चौकात गेले असता त्यांची गाडी अडवून चावी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर अमन चढ्ढा, करण चढ्ढा आणि मनीष आनंद यांनी विनयभंग करून तक्रारदारांना मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

औंध येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. आधी चढ्ढा यांनी हर्षवर्धन जाधव व त्यांच्या मैत्रिणीविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार जाधव यांना अटकही झाली होती. चढ्ढा यांनी दिलेल्या तक्रारीत हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या मैत्रिणीने ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याचे म्हटले होते.

जाधव आपल्यालाही मारहाण झाल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नव्हती. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. तक्रारदारांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार कोर्टाने सीआरपीसी १५६(३) प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले.

या प्रकरणी अमन चढ्ढा, करण चढ्ढा, ममता चढ्ढा, अजय चढ्ढा, मनीष आनंद ( रा. खडकी बाजार) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा