दानवेंना निवडणुकीत पराभूत केले नाही तर मी बापाची औलाद नाहीः हर्षवर्धन जाधवांचा इशारा

0
5154
संग्रहित छायाचित्र.

पुणेः केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा पराभव केला नाही तर मी माझ्या बापाची औलाद नाही, असा जाहीर इशाराच हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून रावसाहेब दानवे यांनी माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तुला नाक घासत आणले नाही तर रावसाहेब दानवे नाव सांगणार नाही, असे दानवे मला एकदा म्हणाले होते. अशी मस्ती त्यांच्यात दिसून येते. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, जालना लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पाडून दाखवल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मी माझ्या बापाची औलाद नाही, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

 काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात पुण्याच्या चतुःशृगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली.

मी आणि माझी सहकारी ईशा झा यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर कुठे तरी पाणी मुरल्याचे दिसत आहे. रावसाहेब दानवे आणि माझ्यातील वाद याला पूर्णपणे कारणीभूत आहे. काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडीओ समोर आणला होता. दानवे माझ्या जिवावर उठले आहेत. माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस दाखल करणार अशी धमकी त्यांनी मला दिली आहे. जेव्हा अशा गोष्टी घडतील तेव्हा त्यासाठी रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी भूमिका मी त्या व्हिडीओत मांडली होती. आज तशीच परिस्थिती आहे, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

आम्हाला संरक्षण द्याः आजवरच्या अनेक घटनांतून रावासाहेब दानवे यांचे नाव पुढे येत आहे. केंद्रातील सत्तेचा पुरेपुर वापर करून गुन्हे दाखल केले गेले आहेत. या सर्व घटना लक्षात घेता मलाआणि माझी सहकारी दोघांनाही बाहेर पडताना भीती वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमच्यासारख्यांना संरक्षण द्यावे, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा