इयत्ता ११ वीतील प्रवेशासाठी सीईटीचे स्वरुप जाहीर, अशी घेतली जाईल प्रवेश परीक्षा

0
108
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः इयत्ता १० वीच्या निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता ११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.

ही प्रवेश परीक्षा पूर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी सीईटीच्या स्वरूपाची माहितीही गायकवाड यांनी जाहीर केली आहे.

सीईटी राज्य मंडळाच्या  इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच ओएमआर पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल.यात इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाइन घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, सीबीएसई, सीआयएससीई व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल.

इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल.

शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विहित करण्यात आलेले शुल्क अदा करावे लागेल.

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना सीईटीमधील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

सन २०२०-२१ वर्षासाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशासंबंधी आकडेवारी  पाहता लक्षात येते की, उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यावर्षीही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण  नसावी, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे. गायकवाड यांनी प्रवेशाची विभागवार आकडेवारीही ट्विट केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा