औरंगाबादः कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली असून त्यांच्या या निर्णयाला कौटुंबिक कुरबुरीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जाते. राजकीय निवृत्ती घेताना जाधव यांनी आपली उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात संजना राजकारणात उत्तूंग भरारी घेतील, असा विश्वासही हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे. हर्षवर्धन जाधव यांना थेट भाजपमध्ये प्रवेश घेणे आणि मिळणेही राजकीयदृष्ट्या अडचणींचे असल्यामुळे पत्नीला पुढे करून कुटुंबाचे भाजपमध्ये राजकीय पुनर्वसन करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
हर्षवर्ध जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. सासरे भाजपमध्ये असले तरी जाधव हे कायम भाजपपासून दूर राहिले आहेत. मात्र राजकारणातून निवृत्तीची घोषणा करताना त्यांनी आपली उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव दानवेंच्या नेतृत्वात राजकारणात उत्तूंग भरारी घेतील. त्यामुळे आपण राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशीच संपर्क साधा, असे हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मिडीयावर जारी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
कायम भाजपपासून दूर, आता पत्नी दानवेंच्या नेतृत्वातः रावसाहेब दानवे हे माझे सासरे असले तरी मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. माझ्या राजकीय निर्णयांचा कुटुंबाशी काहीही संबंध नाही, असे यापूर्वी वारंवार सांगणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांच्या या राजकीय निर्णयाचा मात्र थेट कुटुंबाशीच संबंध असल्याचे त्यांनीच जारी केलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट झाले आहे. ‘प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. तशा आमच्यातही घरात झाल्या. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये,’ असे सांगत कौटुंबिक कुरबुरीची आणि या निर्णयाशी कुटुंबाचा संबंध असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे.पत्नी संजना जाधव ज्येष्ठ नेते दानवेंच्या नेतृत्वात उत्तूंग भरारी घेतील, असे सांगून संजना जाधव या भाजपमध्येच काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे थेट भाजपमध्ये जाता ये नसल्यामुळे पत्नीला पुढे करून कुटुंबाचे राजकीय पुनर्वसन करण्याचा जाधवांचा हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
राजकीय संन्यास नव्हे, निवृत्तीः राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा करताना हर्षवर्धन जाधव यांनी मुद्दामच ‘राजकीय संन्यास’ असा शब्दप्रयोग केलेला नाही. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. सेवेतून निवृत्त झालेली एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे पुन्हा सक्रीय होऊ शकते, त्याप्रमाणे हर्षवर्धन जाधव यांनीही राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याची कवाडे खुली ठेवली आहेत. विशेष म्हणजे अध्यात्म वाचनाचा छंद जोपासताना आपणाला काही गोष्टींची जाणीव झाली आणि त्यातून राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असे कारण त्यांनी या निर्णयासाठी दिले आहे. हर्षवर्धन जाधवांचे हे ‘अध्यात्म वाचन’ पत्नी संजना जाधव भाजपमध्ये सक्रीय होईपर्यंत सुरूच राहील आणि नंतर त्यांना याच ‘अध्यात्म वाचना’तून पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचा साक्षात्कारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.