माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन आणि शिवसेनेचे सुहास दाशरथे मनसेत!

0
341
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा मनसेची वाट धरली आहे. मनसेत प्रवेश करताच त्यांनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली असून खैरेंनी खासदारकीचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे, यापुढे ते कधीही खासदार होणार नाहीत, असे जाधव म्हणाले. जाधव यांच्यासोबतच भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन आणि कट्टर शिवसैनिक सुहास दाशरथे यांनीही मनसेत प्रवेश केला. दाशरथे यांचा मनसे प्रवेश शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर मनसेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथे मतभेद झाल्यानंतर स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार होते. त्यांना मिळालेल्या  2 लाख 83 हजार मतांमुळेच चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याचे मानले जाते.

मनसेत प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंवर तोफ डागली. खैरेंनी माझ्यावर वैयक्तिक टीका करणे थांबवले पाहिजे. त्यांनी आता खासदारकीची स्वप्ने पाहणेही सोडून द्यावे. यापुढे ते कधीही खासदार होणार नाहीत, असे जाधव म्हणाले. मध्यंतरी मी थोडा विचलित झालो होतो. काही गैरसमज होते, तेही दूर झाले आहेत,त्यामुळे पुन्हा मनसेत प्रवेश केल्याचे जाधव म्हणाले. त्यांच्यासोबतच प्रकाश महाजनही पुन्हा स्वगृही परतले आहेत. विशेष म्हणजे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या सुहास दाशरथे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. सत्ताधारी पक्षातून अस्तित्वाच्या शोधात असलेल्या मनसेत ते गेल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा