परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईत खंडणीचा गुन्हा, अडचणी आणखी वाढणार

0
386
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग स्वतःच पुरते अडकत चालले आहेत. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरी ड्राइव्ह पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण आठ जणांची नावे आहेत. त्यात परमबीर सिंग यांच्यासह सहा पोलिस आहेत. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून परमबीर सिंग यांनाही लवकरच अटक केली जाण्याचीही शक्यता आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाशेजारी स्फोटके असलेली स्कार्पिओ कार आढळल्यानंतर या प्रकरणात निष्क्रियतेचा ठपका ठेवून परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मुंबईचे पोलिस आयुक्तपद जाताच परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती.

परमबीर सिंग यांच्या या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. या प्रकरणात सध्या अनिल देशमुख यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. पण या प्रकरणानंतर परमबीर सिंग स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकत चालले आहेत.

मुंबईचे पोलिस आयुक्तपद जाताच परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला आहे. सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण मिळवले आहे. आता ते खंडणीच्या प्रकरणात अडकले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा