परमबीर सिंह यांची गच्छंती अटळ, आज निघणार निलंबनाचे आदेश?

0
96
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून आजच त्यांच्या निलंबनाचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाशेजारी स्फोटकासह आढळून आलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यांना होमगार्डच्या महासंचालकपदी बसवण्यात आले होते. बदलीचा हा आदेश निघताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहिन्याला शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने चौकशी सुरू केली होती. आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांची चौकशी करून चौकशी अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर केला असून तो महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. बेशिस्त वर्तणूक आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधीचा आदेश आजच निघण्याची शक्यताही या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे.

परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात खंडणी वसुलीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. कोट्यवधी रुपयांच्या खंडणी वसुलीप्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह २९ आरोपींविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. खंडणीवसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले होते. तब्बल सहा महिने अज्ञातवासात राहिलेले परमबीर सिंह मुंबईत प्रकटले आहेत. त्यांनी चांदीवाल आयोगासमोर हजेरीही लावली आहे. मुंबई पोलिसांनीही त्यांची सात तास चौकशी केली आहे.

परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते. बेशिस्त वर्तणूक आणि अनियमितता यासाठी आम्ही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या निलंबनाची प्रक्रियाही सुरू आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा