माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन, देशाने अभ्यासू नेता गमावला

0
99
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारताचे माजी राष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक असा लौकिक आणि राजकारणात प्रणवदा म्हणूनच ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे आज आर्मी रूग्णालयात उपचारादम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे सुपुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी दिली.

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे आज सकाळीच प्रणवदा सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती आर्मी रूग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली होती. जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की, डॉक्टरांकडून अथक परिश्रम, देशभरातून प्रार्थना होत असूनही माझे वडिल प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे, असे ट्विट अभिजीत मुखर्जी यांनी केले आहे.

प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी झाला होता. पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील मिरती हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडिल कामदा किंकर मुखर्जी स्वातंत्र्यसैनिक होते. प्रणवदांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. पोस्ट अँड टेलिग्राफ ऑफिसमधून क्लार्क म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापक आणि पत्रकार म्हणूनही काम केले.

 दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणवदा राजकारणात सक्रीय झाले होते. १९७३ मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. १९८२ ते ८४ या काळात केंद्रीय अर्थमंत्री आणि १९८० ते १९८५ या काळात राज्यसभेतील पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९९१ मध्ये नियोजन आयोगाचे अध्यक्ष, पी. व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात ते परराष्ट्रमंत्रीही होते. यूपीए सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते. २०१२ ते २०१७  या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते.

 राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. प्रणवदांनीच सोनिया गांधींना राजकारणातील सर्व डावपेच शिकवले, असे म्हटले जाते. २०१९ मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. प्रणवदांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुखः व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा