भास्करराव पेरे पाटील मीडियावरच भडकले, म्हणाले निवडणूक लढलोच नाही तर पराभव कसा?

0
1434
संग्रहित छायाचित्र.

श्रीगोंदाः ग्रामपंचायत निवडणुकीपासून मी पूर्णतः अलिप्त होतो. आमच्या कुटुंबातील एकाही सदस्याने मतदान सुद्धा केले नाही. त्यामुळे मुलीच्या पराभवाचे जे चित्र मीडियातून मांडले जात आहे, ते चुकीचे आहे. मी निवडणूक लढलोच नाही तर पराभव कसा? असा सवाल करत आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील मीडियावरच भडकले.

औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोद्यात तब्बल २५ वर्षे सरपंच राहिलेले भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची राज्यभर चर्चा झाली आणि  भास्करराव पेरे पाटील २५ वर्षांनंतर पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाल्याचा सूरही उमटला.

श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमासाठी पेरे पाटील आले असता मीडियाने त्यांना गाठले. गेल्या पंचवीस वर्षांत पाच निवडणुका आपण लोकशाही मार्गानेच लढवल्या. पंचवीस वर्षे गावात काम करण्याची संधी मला मिळाली. यावर्षी मात्र निवडणुकीसापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलो नाही, असे पेरे पाटील म्हणाले.

पाटोदा ग्रामपंचायतीच्या आठ जागा बिनविरोध झाल्या. तीन जागांसाठी मतदान घ्यायची वेळ आली. माझ्या मुलीने जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हाच तू तुझा निर्णय घे, मला सर्व उमेदवार सारखेच आहेत. या निवडणुकीत मी कोणाचाही प्रचार करणार नाही, असे सांगितले होते, असेही पेरे पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या काळात मी गावात न थांबता बाहेरच राहिलो. आमच्या कुटुंबात ११ मते आहेत. या निवडणुकीत माझ्यासह घरातील कोणीही मतदान केले नाही. यावरून निवडणुकीत आमची काय भूमिका होती, हे लक्षात येईल. मुलीचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला. मात्र वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून मीडियात जे चित्र मांडले जात आहे, ते चुकीचे आहे, असे सांगतानाच चांगले काम केल्याने पंचवीस वर्षे लोक पाठिशी राहिले असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा