महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, फक्त पुलवामासारखे काही घडू नये : शरद पवार

0
250

महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, फक्त पुलवामासारखे काही घडू नये : शरद पवार
औरंगाबाद : देशाच्या सीमेवर पुलवामा हल्ला झाला आणि त्याचा फायदा भाजपला झाला. यामुळेच भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत पुलवामासारखे काही घडले नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला घडला की घडवला गेला? याबाबत लष्करी अधिकार्‍यांनाच शंका होती. मात्र देशाचा विषय असल्याने यावर काही बोलू नका, असे मी त्यांना सांगितले होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, संपूर्ण मराठवाड्यात फिरलो. शेतकरी आणि तरुणांमध्ये उत्साह आहे. बैठका बोलावल्या होत्या. त्याच्या जाहीर सभा झाल्या. कोणतेही मोठे निमंत्रण नसताना साध्या निरोपावरच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. नाशिक येथे भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. तेथे केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांना आता शेजारचा देश आवडू लागला आहे, असेही मोदी म्हणाले होते. मोदींच्या या वक्तव्याचा समाचारही पवारांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्थिक मंदीबाबत काही बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीही घडले नाही, असे पवार म्हणाले.
राज ठाकरेंचे काँग्रेसला वावडे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मनसेला सोबत घेईल अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासूनच रंगली होती. मात्र मनसेला आघाडीने म्हणजेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने सोबत घेतले नाही, याचे गुपित शरद पवार यांनी मांडले. ते म्हणाले, राज ठाकरेंचे आम्हाला नाही, तर काँग्रेसला वावडे आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेला सोबत घेण्याची इच्छा होती. पण काँग्रेसला इच्छा नाही. त्यामुळे तो विषय सोडून दिला. काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेकाप हे सगळे आमच्यासोबत आहेत, असे पवार म्हणाले.
निवडणूक आयोग ऐकेना; ईव्हीएमविरोध संपला
ईव्हीएमवरही पवार यांनी भूमिका मांडली आणि मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सगळ्याच पक्षांनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ऐकूनच घेतले नाही. त्यामुळे तो विषय आता संपला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील प्रश्न कसे सोडवले? आणि भविष्यात काय करणार हे सांगत आहेत. हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. धनंजय मुंडे यांनी या सरकारमधील 16 मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढली. त्याची चौकशी व्हायला हवी होती. मात्र हे सरकार चौकशी कधीच करणार नाही, असाही आरोप शरद पवार यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा