आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठात होणार शेतीसाठीच्या औजारांची चाचणी आणि प्रमाणीकरण

0
50
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई:  कृषी विभागाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना पुरविण्यात येणारी औजारे प्रमाणित करण्यासाठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये आवश्यक त्या सुविधा उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्राच्या योजनेतून निधी मिळवून या विद्यापीठांमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने केली जाणार असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर ट्रेलर या यंत्रांसाठी मुंबईच्या व्हीजेटीआय यांचा चाचणी अहवाल ग्राह्य धरण्याच्या विषयावर कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी संचालक दिलीप झेंडे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चला उद्योजक बनाः एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

एखाद्या कृषी औजाराची ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असल्यास त्या यंत्रांची केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थांकडून चाचणी करुन प्रमाणित करुन घेण्याच्या मार्गदर्शिका केंद्राने दिलेल्या आहेत. या अधिसूचित संस्थांमध्ये महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना यांत्रिक औजारे पुरविल्यानंतर या यंत्रांची चाचणी करुन घ्यावी लागते मात्र ट्रॅक्टर ट्रेलर या यंत्रासाठी चाचणीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास अडचण  निर्माण होत असल्याच्या तक्रारी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. यंत्रे प्रमाणित करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांकडून ते प्रमाणित करून घ्यावे आणि कमी रकमेत सध्याच्या केंद्रांमध्ये व्यवस्था उभी करुन यंत्रसामुग्री प्रमाणित करुन घेण्याच्या सूचनाही कृषीमंत्री भुसे यांनी दिल्या.

कृषी यंत्रांच्या चाचणी आणि प्रमाणिकरणासाठी निवडलेल्या केंद्रांमध्ये कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासन दीड कोटी रुपयांचे अनुदान देते, त्यामुळे या सुविधा उभारणीसाठी संबंधित विद्यापीठांनी शासनाकडे पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

ट्रॅक्टर ट्रेलरबरोबरच कांदा पेरणी यंत्र, स्लरी यंत्र याशिवाय शेतकऱ्यांच्या सूचना मागवून त्यांच्याकडून प्राप्त यंत्रांचा समावेश या प्रस्तावात करण्याच्या सूचनाही कृषी विभागाच्या समितीला यावेळी कृषीमंत्र्यांनी दिल्या.  यंत्रांची चाचणी आणि प्रमाणित करण्याअभावी  शेतकऱ्यांची  होणारी गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने तातडीची पावले उचलून कार्यवाही करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

कृषी विद्यापीठांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन दालनः कृषी क्षेत्रात नित्य नवे प्रयोग होत असून शेतीसाठी शेतकऱ्यांनी कल्पकतेतून तयार केलेल्या यंत्रांची माहिती इतर शेतकऱ्यांना व्हावी यासाठी अशा सर्व यंत्रसामुग्रीचे कृषी विद्यापीठांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन भरवण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा