४० पोलिसांच्या खास टीममे फत्ते केले ‘ऑपरेशन अर्णब’, गोस्वामी पळून जाण्याची होती भीती!

0
808
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः २०१८ मध्ये अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ४० पोलिसांची उच्चस्तरीय खास टीम बनवली होती. अटकेची खबर लागल्यास अर्णब गोस्वामी मुंबईबाहे पळून जाण्याची भीती असल्यामुळे या टीमनेच अत्यंत गोपनीयता राखत ‘ऑपरेशन अर्णब’ फत्ते केले आणि अखेर अर्णब गोस्वामी यांना गजाआड व्हावे लागले.

 वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांना नव्याने तपास करण्यास परवानगी मिळाल्यानंतरच्या काही दिवसांनीच ‘ऑपरेशन अर्णब’ची तयारी सुरु करण्यात आली होती. या मोहिमेसाठी मुंबई आणि रायगड पोलिसांतील ४० जणांची निवड करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचाः अर्णब गोस्वामींसाठी पोलिसांवर दबाव टाकणारा फडणवीस सरकारमधील ‘तो’ ज्येष्ठ मंत्री कोण?

 संजय मोहिते यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेची योजना आखली.  या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांच्यावर सोपवण्यात आली होती. ‘पॉवरफुल’ अर्णब गोस्वामींना अटक करणे हे संजय मोहिते यांच्या नेतृत्वातील टीमसमोर एक मोठे आव्हान होते. आम्ही प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकली. अर्णबकडून उकसवण्याचा भरपूर प्रयत्न होऊनही या ४० जणांच्या पथकातील प्रत्येक सदस्याने प्रचंड संयम राखला, असे मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ सदस्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

 अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींचा सहभाग असल्याची खात्री प्राथमिक तपासातच पटली. त्यानंतर या चाळीस जणांच्या टीममधील सदस्यांनी अर्णब रहात असलेल्या इमारतीची अनेकदा पाहणी केली. ही एक अत्यंत गोपनीय मोहीम होती. या मोहिमेची माहिती फुटली तर अटक टाळण्यासाठी अर्णब गोस्वामी मुंबईबाहेर पळून जाण्याची शक्यता होती, असेही या सदस्याने सांगितले.

अर्णब यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. अर्णब घरीच असल्याची खात्री पटल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी सकाळची वेळ निवडली. ही एक गोपनीय मोहीम होती. अगदी बारिक- सारिक गोष्टींचीही खबरदारी घेण्यात आली. अर्णब गोस्वामींचे दार कोण ठोठावणार? अर्णब आणि त्यांच्या कुटुंबाशी कोण बोलणार? आणि अर्णब यांनी अटकेला विरोध केला तर काय करायचे?, अशी प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली होती. परंतु सचिन वाझे यांनी अर्णब यांना तुम्ही जर तपासात सहकार्य केले नाही तर काय कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात, हे समजावून सांगितल्यानंतर अर्णब पोलिसांसोबत यायला तयार झाले आणि ही मोहीम फत्ते झाली, असेही या ज्येष्ठ सदस्याने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा