विद्यार्थ्यांकडे स्वतःचे जात प्रमाणपत्र नसले तरीही मिळणार इयत्ता अकरावीला प्रवेश!

0
98
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः  अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे  स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरत्या स्वरुपाचा प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

 प्रवेशाची प्रक्रिया म्हटले की कागदपत्रे आणि आवश्यक प्रमाणपत्रे जमा करावीच लागतात आणि एखादे प्रमाणपत्र नसेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेशालाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्याचे असे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

इयत्ता अकरावीतील प्रवेशाच्या वेळी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने जात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे स्वतःचे जात प्रमाणपत्र नसले तरी विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश घेताना कोणतीही अडचण येणार नाही. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

 स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये, यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे, असे प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर इयत्ता अकरावीत तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ३० दिवसांच्या मुदतीत स्वतःचे जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळाला आहे, त्यांना जात प्रवर्गाबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता असणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा