अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट!

0
63
संग्रहित छायाचित्र.

मुंबई कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची यंदा दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला असून ही भेट दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार ३५३ अंगणवाडी मदतनीस व ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जाऊन महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री अ‍ॅड. ठाकूर म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा