एक ट्रिलियनवर शून्य किती ?: गौरव वल्लभ यांच्या प्रश्नाने भाजप प्रवक्ते संबित पात्रांची बोलती बंद

0
257

नवी दिल्ली : टीव्ही डिबेट्समध्ये कायम ‘बैठ जा मौलाना’ आणि ‘मंदिर वहीं बनाएंगे…’यासारखी डायलॉगबाजी करून चर्चेत रहाणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची एका टीव्ही डिबेटमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी चांगलीच फजिती करून टाकली. पाच वर्षांत आम्ही भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करून दाखवू असा त्वेषाने दावा करणाऱ्या संबित पात्रा यांना गौरव वल्लभ यांना ‘एका ट्रिलियनवर किती शून्य असतात?’ असा खोचक सवाल केला आणि संबित पात्रांची चांगलीच भंबेरी उडाली. संबित पात्रा प्रश्नाचे उत्तर फिरवाफिरवी करून टाळत होते. तरीही या बाका प्रसंगातून सुटका होत नाही, असे लक्षात येताच ‘ना सिर झुका के जियो और न सिर उठा के जियो..’ हे सिनेमातील गाणे गुनगुनू लागले. पूर्ण फॉर्मात असलेल्या गौरव वल्लभ यांनीही त्याच गाण्याचे बोल गुनगुनतच त्यांनी संबित पात्रांना विचारले, ‘मूळ मुद्दा टाळू नका, सांगा, एक ट्रिलियनवर किती शून्य असतात?’ तरीही संबित पात्रा या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही.

या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबित पात्रांची खेचली जात आहे आणि गौरव वल्लभ कोण आहेत? त्यांना लगेच काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करून टाका, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. काही नेटकरी तर सर्वच विरोधी पक्षांनी गौरव यांनाच आपला प्रवक्ता नेमून टाकले पाहिजे, अशाही प्रतिक्रिया देत आहेत.

संबित पात्रा यांची फजिती होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनेही संबित पात्रांना एका टीव्ही डिबेटमध्ये असेच खिंडित गाठले होते. कन्हैया कुमारवर मोदी सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर झालेल्या या चर्चेत संबित पात्रांनी कन्हैया कुमारला ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा द्यायला सांगितले होते. कन्हैयाने त्या दिल्या आणि अब तुम बोलो, ‘नथुराम गोडसे मुर्दाबाद’ तेव्हाही संबित पात्रांनी ही घोषणा देणे टाळण्यासाठी टीव्ही डिबेटच भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

कोण आहेत गौरव वल्लभ?

गौरव वल्लभ हे राजस्थानच्या पाली शहराचे रहिवासी आहेत. पालीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरमध्ये सीएचे शिक्षण घेतले. त्यांनी पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षे सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. अजमेरच्या महर्षि द्यानंद विद्यापीठाचे ते एमकॉमला सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठासह 20 देशांत रिसर्च पेपर सादर केले आहेत. 2017 मध्ये टेक्सास विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून परतलेल्या गौरव वल्लभ यांना देशात सुरू असलेले मॉब लिंचिंगचे प्रकार पाहून अस्वस्थ केले. काँग्रेस विचारसरणी जवळची वाटत असल्याने त्यांनी 2018 पर्यंत पॅनलिस्ट म्हणून काम केले. त्यांच्याच विनंतीवरून जानेवारी 2019 मध्ये राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे नेमके सत्य काय?

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना येत्या पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर (5000000000000) करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. हे एक नवीन स्वप्न तर आहेच परंतु या निमित्ताने थोडी वस्तुस्थितीही समजून घेऊ या. सरकार पाच वर्षांत भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होऊन जाईल, असे सांगत असले तरी त्यासाठी आर्थिक विकासदर 8 टक्के राहिला तरी 9 वर्षे लागतील. पाच वर्षांत अर्थव्यवस्था दुप्पट करायची तर त्यासाठी आर्थिक विकासदर 12 टक्के असायला हवा, असे अनेक अर्थशास्त्रज्ञ सांगत आहेत. पण सरकार पाच वर्षे आर्थिक विकासदर 8 टक्के राहिला तरी 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल, असे सांगत आहे. हे कसे होणार? या प्रश्नाचे उत्तर सरकार आशा, विश्वास, आकांक्षा आणि ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर चिराग जलता है..’ अशा शायरीने देते आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ( एप्रिल-जून) भारताचा आर्थिक विकासदर केवळ 5 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. पाच ट्रिलियन डॉलरचे स्वप्न दाखवताना 2018 मध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत घाना, नायजेरिया, निकारागुआ, श्रीलंका हे देशही भारतापेक्षा पुढे होते, हे सांगितलेच जात नाही. अर्थव्यवस्थेचा आकार वाढतो, तेव्हा दरडोई उत्पन्नही वाढते, हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, परंतु त्याकडेही पद्धतशीर दुर्लक्ष केले जाताना दिसून येत आहे. त्यामुळे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशी साध्य करणार? हा प्रश्न अनुत्तरितच रहातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा