मुलींना वसतिगृहासाठी मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान

0
333
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरीक विकासासाठी प्रशिक्षण या योजनेत जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता प्रतिप्रशिक्षणार्थी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलीना संगणकाबाबतचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५० हजार रुपये असलेल्या कुटुंबातील मुलींना देण्यात येत होता. आता कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

त्या त्या जिल्ह्यांतील महिला बालकल्याण समित्यांमार्फत निर्णय घेऊन उपलब्ध अनुदानानुसार या विविध योजनांपैकी मंजूर योजना जिल्ह्यात राबवण्यात येतील. महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांत महिला व बालकल्याण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात या समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे १० टक्के निधीतून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत काही नवीन बाबी तसेच काही बाबींची दर्जोन्नत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा बारावीनंतर सत्कार यापूर्वी करण्यात येत होता. आता दहावी व बारावीच्या १८ वर्षाच्या आतील मुलांचा व मुलींचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा