धार्मिक संस्थांकडून कर्जरूपाने सोने घेण्याच्या योजना भाजप प्रधानमंत्र्यांच्याचः पृथ्वीराज चव्हाण

0
293
संग्रहित छायाचित्र.

कराड: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २ टक्क्यांनी व्याज द्यावे, अशी सूचना मी काल केली होती.  काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक संस्थांकडून सोने कर्ज रूपाने घेण्याची योजना आतापर्यंत दोन प्रधानमंत्र्यांनी राबवली आणि ते दोन्ही प्रधानमंत्री भाजपचेच आहेत, असे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

चव्हाण यांनी केलेल्या सूचनेवरून काही जणांनी समाज माध्यमातून विपर्यस्त अर्थ लावून अपप्रचार चालवण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज हा खुलासा केला आहे.  मी केलेली सूचना ही चालू सरकारी योजनेचाच भाग आहे. अशा प्रकारची योजना पहिल्यांदा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९८ च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर १९९९  रोजी गोल्ड डिपॉझिट स्कीम या नावाने सुरू केली होती.  नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचे नाव बदलून  गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम-२०१५ अशी नवी योजना सुरू केली. योजनेच्या पहिल्या वर्षातच देशभरातील ८ मंदिरांनी त्यांचे सोने विविध बँकांमध्ये ठेवले असे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. यामध्ये शिर्डी तसेच तिरुपती या देवस्थानांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०२० पर्यंत या योजने अंतर्गत ११ बँकांमध्ये २०.५ टन सोने जमा झाले आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

भक्त माध्यमांकडून विपर्यासः आपल्या देशातील बरेचसे सोने हे व्यवहारात नाही, असे वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल सांगतो. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनिमय करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मी ही सूचना केली होती. परंतु काही व्यक्तींनी आणि भक्त माध्यमांनी याचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मी एका विशिष्ट धर्माला केंद्रबिंदू केले आहे असे भासवले. या संदर्भात मी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करेन, असे सांगतानाच आत्तापर्यंत भारतात दोन प्रधानमंत्र्यांनी सोने कर्ज रूपाने घेण्याची योजना राबवली आहे. योगा-योगाने हे दोघेही भारतीय जनता पक्षाचेच आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा