मुंबईः कोरोना महामारीच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत मिळू लागल्यामुळे सोने आणि चांदीच्या भावातील तेजी ओसरू लागली आहे. बुधवारी सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा भाव पुन्हा ४९ हजार रुपयांच्या खाली आला आहे,
मल्टि कमॉडिटी बाजाराता सोन्याच्या भावात २३५ रुपयांनी घसरण झाल्यामुळे सध्या प्रति दहा ग्रॅमला म्हणजेच प्रतितोळा सोन्याचा भाव ४८ हजार ९०८ रुपये झालाआहे. चांदीच्या भावालाही नफेखोरीची झळ बसल्यामुळे एक किलो चांदीचा भाव २३८ रुपयांनी घसरून ६६ हजार २९७ रुपयांवर आला आहे.
बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. त्याआधी सोमवारीही कमॉडिटी बाजारात सोने घसरले होते. मुंबईत बुधवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ३३० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार ३३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने ४७ हजार ९०० रुपये तोळा तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२ हजार २५० रुपये प्रतितोळा आहे. तिकडे चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रतितोळा ४६ हजार २१० रुपये तर २४ कॅरेट सोने प्रतितोळा ५० हजार ६१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८ हजार ४९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव ५१ हजार १९० रुपये आहे.
जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तेथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आली आहे. जो बायडन यांनी अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच बरोबर १.९ लाख कोटी डॉलर्सचे भलेमोठे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होणार आहे. या सर्व गोष्टींचे सकारात्मक परिणाम बाजारावर उमटलेले दिसले. जागतिक कमॅडिटी बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ८५०.९० डॉलर होता तर चांदीचा भाव प्रतिऔंस २५.५४ डॉलर होता.