मुंबई: बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा दिलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणाशी संजय राठोड यांचे नाव जोडल्या गेल्यानंतर मागच्या रविवारी राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक भेट घेऊन वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र राठोड यांनी राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे राठोडांचा राजीनामा कुठे आहे? अशी विचारणा करत भाजपकडून सरकारवर टिकेची झोड उठवण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राठोड यांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी करून तो आजच राजभवानात पाठवला होता. मुख्यमंत्र्यांकडून आजच दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली.