दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा पदभार, राज्यपालांची मंजुरी

0
113
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पंधरा दिवसांत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.  देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करून गृहमंत्रिपदाचा पदभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली आहे. दरम्यान, राज्यपालांनी देशमुखांचा राजीनामा आणि वळसे पाटलांकडे गृहमंत्रिपदाचा पदभार देण्यास मंजुरी दिली आहे.

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गृहमंत्रिपदासाठी पहिली पसंती दिलीप वळसे पाटील हेच होते. मात्र वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद चालून आले आहे.

देशमुखांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांचेकडे  देण्यास मंजुरी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्राम विकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा