राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत कोश्यारींकडून अद्याप निर्णय नाही, तिन्ही पक्ष ठरवणार रणनिती

0
93

मुंबईः विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यानंतरही अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने महाविकास आघाडी समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढील कोणते पाऊल टाकायचे याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला चांगलाच अडचणीचा ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते कोरोनाचा कार्यकाळ व राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावादरम्यान सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध कसे विकोपाला गेले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळेच १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव बहुचर्चित ठरला आहे. राज्यपाल नियुक्त जागांसाठीचे निकष यावेळी चांगलेच पारखून निर्णय घेणार असल्याचे संकेत राज्यपालांनी दिल्याने महाविकास आघाडी सरकारनेही अतिशय तोलूनमापून नावांची यादी बनवली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रासोबत बंद लखोट्यात ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर करण्यात आली होती.

नव्या सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय १५ दिवसांत घ्यावा असे विनंती पत्रही यादीसोबत राज्यपालांना सादर केले होते. मात्र, कायद्यानुसार मुदतीत निर्णय घेण्याचे बंधन राज्यपालांना नाही. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सरकारचे लक्ष लागले आहे. तर विनंती मुदत संपल्याने आता याबाबत पुढचे पाऊल कशा पद्धतीने टाकायचे याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून घेतील अशी माहिती शिवसेना नेते, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा