‘विधान परिषदेवरील १२ सदस्यांची यादी राज्यपाल बाजूला ठेवणार, फडणवीसांशी चर्चेत आधीच ठरले!’

0
1400
संग्रहित छायाचित्र.

कोल्हापूरः महाविकास आघाडी सरकारकडून पाठवली जाणारी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बाजूला ठेवणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोश्यारी यांच्यात झालेल्या चर्चेत हे आधीच ठरले आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून शिफारस करण्यात आलेली प्रत्येकी चार नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवणार आहेत. त्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. राज्यपाल आणि राज्य सरकारचे संबंध लक्षात घेता निकषाची फूटपट्टी लावून राज्यपाल आपण पाठवलेली नावे नाकारू शकतात, हे लक्षात घेऊनच सरकारमधील तिन्ही पक्षांनी नावे निवडताना काळजी घेतली आहे. परंतु तरीही राज्यपाल ही नावे बाजूला ठेवणार आहेत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांत झालेल्या चर्चेत हे आधीच ठरले आहे, असा गौप्यस्फोट करून मुश्रीफ यांनी खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचाः ‘तेल लावलेले पहिलवान’विरुद्ध भाजपचा सामनाः विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर!

आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर त्यंचे सांत्वन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आ. कोरो यांच्याकडे गेले होते. तेथेच चंद्रकांत पाटलांनी आ. कोरेंशी चर्चा करताना राज्यपाल विधान परिषदेवरील १२ सदस्यांची यादी बाजूला ठेवणार असल्याचे वक्तव्य केल्याचा दावाही मुश्रीफ यांनी केला आहे.

राज्याच्या कारभारात राज्यपालांचा हस्तक्षेप सुरु आहे. राज्य सरकारने काढलेल्या अनेक अध्यादेशांवर राज्यपाल कोश्यारी वेळेवर सह्या करत नाहीत. संविधानाच्या पलीकडे जाऊन राज्यपाल कोश्यारी हे राजकीय निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोपही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा