राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्याच्या आधीच राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस

0
525
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करते की नाही, याची प्रतीक्षा न करताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. महाराष्ट्राचे सरकार राज्यघटनेनुसार चालवता येणे शक्य नाही, याची खात्री राज्यपालांना पटल्यामुळे राज्यघटनेच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे, असे राजभवनाने ट्विट केलेल्या पत्रकारत म्हटले आहे.

दिलेल्या मुदतीत शिवसेनेला सोमवारी सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी रात्री सर्वात मोठा तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेचे निमंत्रण देऊन आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सरकार स्थापनेचा दावा करण्याची मुदत दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही, याची प्रतीक्षा राज्यपाल आज रात्री 8.30 वाजेपर्यंत तरी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे न करता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा करू शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा