औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत पाइप लाइनला बसवणार जीपीएस यंत्रणा

0
47

मुंबई:  औरंगाबाद शहराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उभारण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जमिनीखालील पाइप लाइनला जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पाइप लाइनच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम सोपे होणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचा आढावा मंत्री पाटील यांनी मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या दृष्टीने जमिनीखालून जी पाईप लाईन गेली आहे तिचा नकाशा कळण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे निर्देशही पाटील यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील वाढीव न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा -३ या योजनेच्या कामाचा आढावाही पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,एमएमआरडीए व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अस्तित्वात येत आहे.या योजनेच्या पाईपलाईनचे काम तातडीने सुरू करावे असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्यासह औरंगाबाद व पनवेल येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा