पोलीस भरतीचा जीआर रद्द, शुद्धीपत्रक काढून मराठा समाजाला देणार ईडब्ल्यूएसमधून आरक्षण

0
28
संग्रहित छायाचित्र.

मुंबई पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने ४ जानेवारी रोजी काढलेला शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आला आहे. याबाबत आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील  २३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

एसईबीसी प्रवर्गाती उमेदवारांसाठी पोलीस भरतीचा जीआर गृहविभागाने ४ जानेवारी रोजी काढला होता.यात एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्‍या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्‍या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करण्यात येणार होती.जे उमेदवार खुल्‍या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात त्‍यांचा खुल्‍या प्रवर्गातून विचार व्हावा असे या निर्णयात म्‍हटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस मेगाभरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण प्रकरण अद्याप कोर्टात आहे. त्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळे तात्काळ पोलीस भरती रद्द करावी. जर पोलिस भरती रद्द केली नाही तर आम्हांला आत्महत्येचा पर्याय द्या, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली होती.  या पार्श्वभूमीवर मराठा तरूणांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजातील तरूणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा