खडसेंचा दोन ओळींचा राजीनामा भलताच चर्चेत, शुद्धलेखनाच्या चुकांवरून ब्राह्मण्य- बहुजन चर्चा!

0
3745
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. मात्र भाजपला धक्का देणारे खडसेंचे दोन ओळींचे राजीनामापत्र चर्चेत आले आहे ते त्यातील मराठी शुद्धलेखनाच्या चुकांमुळे!

 खडसे यांनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला. दोन ओळींच्या या राजीनामापत्रात मराठी शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका आहेत. हेच राजीनामापत्र इंग्रजीत असते तर त्यातील स्पेलिंगच्या चुकांची चर्चा झाली असती आणि बातम्याही झाल्या असत्या. मात्र, मराठी शुद्धलेखनाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे सांगत नेटकऱ्यांनी या राजीनामापत्रातील शुद्धलेखनाच्या चुकांवर बोट ठेवले आहे.

 अहमदनगरचे हेरंब कुलकर्णी यांनी पहिल्यांदा एकनाथ खडसे यांच्या राजीनामापत्रातील चुकांकडे लक्ष वेधले. ‘एका पत्रात किती शुद्धलेखन चुका असाव्यात?? हे राजीनामा पत्र जर इंग्रजीत असते तर फक्त spelling च्या चुकांसाठी गाजले असते पण मराठीत शुद्धलेखन दुर्लक्षित असते. मी ही अनेक शब्द चुकतो पण दोन ओळीच्या राजीनामा पत्रात किती चुका असाव्यात? १) प्रती शब्द प्रति हवा, २)वैयक्तीक शब्द वैयक्तिक हवा, ३)प्राथमीक शब्द प्राथमिक हवा, ४)ऑक्टोबर वर टिंब दिलाय तो नको, ५)वर महसुल शब्द महसूल हवा, ६) कृषीमंत्री शब्द कसा लिहावा?, ७) विधानसभा हे जोडून हवे, नाथाभाऊ दोन ओळींच्या पत्रात की जे पत्र खूप फिरणार आहे त्याबाबत इतके दुर्लक्ष कसे होते?, असे हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

मराठी शुद्धलेखनाचा आग्रह धरणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांनी फेसबुकवर ही पोस्ट केली. त्यात त्यांनीही शुद्धलेखनाच्या चुका केल्या आहेत, हे विशेष! त्यांनी फेसबुकवर केलेली ही पोस्ट आम्ही आहे तशी दिली आहेत. या पोस्टमध्ये लिहिलेला ‘राजीनामा पत्र’ हा शब्द ‘राजीनामापत्र’  असा हवा. ‘मी ही अनेक शब्द चुकतो…’ या वाक्यात ‘मीही’ हवे. ‘असते आणि पण’मध्ये स्वल्पविराम हवा.

असे असले तरी हेरंब कुलकर्णी यांच्या या पोस्टवर फेसबुकवर चर्चा घडून आली आहे. शुद्धलेखन हा शब्दप्रयोग करणे आता तरी बंद करायला हवे. भाषेत शुद्ध अशुद्ध काही नसते. लेखन नियमांनुसार म्हणायला हवे, असे श्रीरंजन आवटे यांनी म्हटले आहे. तर खडसे हे काही मराठी व्याकरणाचे अभ्यासक नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्रातील चुका काढणे गैर आहे, असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

बहुजन लोकांच्या शुद्धलेखनाच्या चुका काढणाऱ्या आणि पिढीजात अभिजन लोकांची बाजू घेणाऱ्या पक्षाचा राजीनामा असाच पाहिजे… अभिव्यक्ती महत्वाची… नियम नव्हे… असे म्हणत काहींनी हेरंब कुलकर्णी यांना फटकारलेही आहे. तर ब्राह्मण्य आणि शुद्धलेखन याचा काय संबंध असावा, असा सवालही काही नेटकऱ्यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांचे हेच ते राजीनामापत्र.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा