सरपंचपदाच्या आधी झालेल्याही आरक्षण सोडती रद्द, आता निकालानंतर ३० दिवसांत होणार सोडत

0
382
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांत सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच २१ जानेवारी निवडणूक निकालाची अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

११ डिसेंबर  रोजीच्या पत्रानुसार सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, काही जिल्ह्यांत मात्र सरपंचपदासाठीच्या आरक्षण सोडती याआधीच झाल्याचे निदर्शनास आले आहे. या झालेल्या सोडतीही आता रद्द करण्यात आल्या असून त्याही आता निवडणुकीनंतर नव्याने घेण्याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

सरपंचपदाच्या आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुनश्च नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर या बाबींचा सारासार विचार करून सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरता तसेच योग्य व्यक्तीस न्याय मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या जिल्ह्यांत सरपंचपदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबवण्यात आला आहे त्या जिल्ह्यात सदर प्रक्रिया रद्द करून नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्याबाबत निर्णय घेतला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

देशातील तसेच राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च  ते डिसेंबर २०२० या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली अशा ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील २९ सप्टेंबर रोजीच्या सुधारणेन्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ११ डिसेंबर रोजीच्या पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. तथापि, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची उद्घोषणा होण्यापूर्वी काही जिल्ह्यांत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढलेली होती व अद्यापही बहुतांशी जिल्ह्यांत आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. हा सर्व सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आता निवडणुकीनंतर होईल.

निकालानंतर ३० दिवसांच्या आत आरक्षण सोडतः आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान कार्यक्रम १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. निवडणूक निकालाची अधिसूचना २१जानेवारी  रोजी प्रसिद्ध होणार आहे. सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबवण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा