ग्रामपंचायत निकालः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावातच फडकला शिवसेनेचा भगवा

0
442
संग्रहित छायाचित्र.

कोल्हापूरः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपचे राज्याचे नेतृत्व करतात, मात्र त्यांच्या मूळ गावातील मतदारांनीच त्यांच्या नेतृत्वावर आणि भाजपवरही विश्वास दाखवला नाही.

खानापूर ग्रामपंचायतीची निवडणूक चर्चेत आली होती ती येथे झालेल्या आघाडीमुळे. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आघाडी केली होती. तरीही हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार खानापूर ग्रामपंचायतीच्या सहा जागावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

हेही वाचाः आदर्श गाव पाटोद्याच्या राजकारणातून भास्करराव पेरे पाटील बाद, निवडणुकीत संपूर्ण पॅनलचा धुव्वा

शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात खानापूर गावात सगळेच एकत्र आले होते. तरीही त्यांनी शिवसेनेकडे विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवले आहे. येथील सहा जागांवर विजयाचे निशाण फडकवत त्यांनी भाजपला जोरदार धक्का देत सत्तांतर घडवून आणले आहे.

हेही वाचाः ग्रामपंचायत निकालः हिवरे बाजारात पोपटरावांचीच सत्ता, नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेना वरचढ

खानापूर ग्रामपंचायतीवर फकडलेला भगवा हा चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाला जोरदार धक्का मानला जात आहे. या आधी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वावर टिकेची झोड उठली होती. आता त्यांच्या मूळ गावातील मतदारांनीही भाजपला नाकारल्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठाच धक्का ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा