औरंगाबादः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणीनंतर आता निवडणूक निकालातील अनेक गमती समोर येत आहेत. असाच एक मजेशीर निकाल औरंगाबाद जिल्ह्यात लागला. जिल्ह्यातील एका उमेदवाराला केवळ आणि केवळ एकच मत मिळाले. ज्या वॉर्डातून त्याने निवडणूक लढवली, त्या वॉर्डात एकूण १९३ मते आहेत. त्यातील फक्त एक मत या उमेदवाराच्या वाट्याला आहे. ते त्याचे स्वतःचेही नव्हते.
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील भायगावगंगा ग्रामपंचायतीच्या निवडणूक मोतीराम माचे यांनी वॉर्ड क्रमांक ३ मधून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात पंढरीनाथ कदम उभे होते. या वॉर्डात एकूण मतदारांची संख्या १९३ आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोतीराम माचे आणि पंढरीनाथ कदम यांनी प्रचंड मेहनत घेतली. परंतु पंढरीनाथ कदम यांना १९१ मते मिळाली तर मोतीराम माचे यांना केवळ एकच! एक मत नोटाला मिळाले.
हेही वाचाः ग्रामपंचायत निवडणुकीत कारभारी जिंकताच कारभारणीने खांद्यावर घेत काढली मिरवणूक!
झाले असे की, मोतीराम माचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे नाव वॉर्ड क्रमांक १ च्या मतदार यादीत आहे आणि ते निवडणुकीला उभे राहिले वॉर्ड क्रमांक ३ मधून. त्यामुळे या निवडणुकीत माचे यांना स्वतःला स्वतःचेही मत देता आले नाही आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांना मतदान करू शकले नाहीत.
हेही वाचाः चला हवा येऊ द्याः सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून शिवसेना पहिल्या क्रमांकावर, भाजपची पिछेहाट!
वॉर्ड क्रमांक ३ मधून पंढरीनाथ कदम हे गेल्या दोन निवडणुकींपासून निवडून येत आहेत. यावेळी माचे यांनी त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तो सपशेल फसला. आता माचे यांनी या निकालावर आक्षेप घेतला असून या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्यामुळेच असा निकाल लागला, असा आरोपही माचे यांनी केला आहे.