ग्रामपंचायत निवडणुकीत कारभारी जिंकताच कारभारणीने खांद्यावर घेत काढली मिरवणूक!

0
2306
छायाचित्रः ट्विटर

खेडः निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उमेदवारांच पाठिराखे, समर्थक, कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करतात. त्या उमेदवाराला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढतात. हे कोणत्याही निवडणुकीच्या निकालानंतर देशभर दिसणारे चित्र. परंतु पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात जे पहायला मिळाले, ते यापेक्षा वेगळे! ग्रामपंचायत निवडणुकीत पती विजयी झाल्यानंतर त्याच्या पत्नीचे त्याला खांद्यावर उचलून घेत गावभर मिरवणूक काढली. ही मिरवणूक आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

 पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाळू हे डोंगराळ भागातील गाव. पाळू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शंकर संतोष गुरव हे उमेदवार उभे होते. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दणदणीत पराभव करत या निवडणुकीत विजय मिळवला. शंकर गुरव यांच्या या विजयाचा आनंद त्यांच्या कार्यकर्त्यांना जसा झाला, त्याहीपेक्षा अधिक तो त्यांची पत्नी रेणुका गुरव यांना झाला.

छायाचित्रः ट्विटर

हेही वाचाः चला हवा येऊ द्याः सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून शिवसेना पहिल्या क्रमांकावर, भाजपची पिछेहाट!

रेणुका गुरव यांनी चक्क आपले पती शंकर गुरव यांना खांद्यावर उचलून घेतले आणि गावभर फेरी मारत या विजयाचा जल्लोष साजरा केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रशासनाने विजयी मिरवणुका काढण्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळे रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची खबरदारी घेतली. ही मिरवणूक आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रेणुका गुरव पती शंकर गुरव यांना गावभर घेऊन फिरल्या आणि विजयाचा जल्लोष साजरा केला. पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जिंकून दणदणीत विजय मिळवला. या विजयात महिलांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा