ग्रामपंचायत निकालः हिवरे बाजारात पोपटरावांचीच सत्ता, नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेना वरचढ

0
534
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होत असून राज्याचे लक्ष लागू असलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवारांनी आपली सत्ता कायम राखली आहे. तर कोकणात नितेश राणेंच्या कणकवली तालुक्यात शिवसेना वरचढ ठरली आहे. तिकडे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात भाजप आमदार प्रताप अडसड यांना जोरदार धक्का बसला असून सावंगा विठोबा गावात काँग्रेसने सातपैकी सातही जागांवर विजय मिळवला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजारमध्ये तीस वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा मोडित काढून यंदा निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीकडे  सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलचे पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादीर, रोहिदास पादीर, रंजना पवार हे विजयी झाले आहेत.

हेही वाचाः आदर्श गाव पाटोद्याच्या राजकारणातून भास्करराव पेरे पाटील बाद, निवडणुकीत संपूर्ण पॅनलचा धुव्वा

कोकणात भाजप नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंचा मतदारसंघ असलेल्या कणकवली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर शशिवसेने विजय मिळवला आहे. भिरवंडे, गांधीनगर ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे.

तिकडे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात भाजप आमदार प्रताप अडसड यांना जोरदार धक्का बसला आहे. सावंगा विठोबा ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या अमोल होले प्रणित पॅनलने सात पैकी सातही जागांवर विजय मिळवला आहे.

मिरवणुका काढण्यास मनाईः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांनी मिरवणुका काढल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश दिले आहेत. आदेश मोडणाऱ्या उमेदवारांविरुद्ध गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा