चला हवा येऊ द्याः सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून शिवसेना पहिल्या क्रमांकावर, भाजपची पिछेहाट!

0
403
प्रातिनिधक छायाचित्र.

मुंबईः राज्यात झालेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ग्रामीण महाराष्ट्राने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. सर्वाधिक ३ हजार १११ ग्रामपंचायती जिंकून शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २ हजार ४०० तर काँग्रेसने १ हजार ८२३ ग्रामपंचायतींवर विजयाचे निशाण फडकवले आहे. भाजपने २ हजार ६३२ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ‘ग्रामपंचायत निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असून तो मान्य केला नाही तर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, चला हवा येऊ द्या’, असे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या १२ हजार २३४ ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आम्हीच नंबर एक असा दावा सोमवारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत होता. त्या निकालाचे चित्र आज स्पष्ट झाले असून शिवसेना हा सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

या निवडणूक निकालानुसार १२ हजार ७११ ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेने ३ हजार ११३ ग्रामपंचायती, भाजपने २ हजार ६३२ ग्रामपंचायती, राष्ट्रवादी काँग्रेसने २ हजार ४००, काँग्रेसने १ हजार ८२३, मनसेने ३६ तर स्थानिक आघाड्यांनी २ हजार ३४४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

या निवडणूक निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे मराठवाड्यात महाविकास आघाडीचाच वरचष्मा राहिला आहे. विदर्भात काँग्रेस आणि भाजपला यश मिळाले आहे. कोकणात शिवसेना तर सिंधुदुर्गात भाजपने प्रभाव राखला आहे. आता सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. ज्याचा सरपंच त्याच्या ताब्यात ग्रामपंचायत असे समीकरण असून आपल्याच पक्षाचा सरपंच व्हावा, यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांना जोर लावाला लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी जुळवाजुळ सुरू केली आहे.

विजयानंतर जल्लोष

नेत्यांना बसले असे धक्केः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. तेथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृहतालुका असलेल्या साकोलीत भाजपने मोठी मुसंडी मारली असून भाजपने १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही धक्का बसला. त्यांचे सख्खे मेव्हणे मनोज शिंदे म्हैसाळकर यांची सत्ता उलथवून चुलत मेव्हणे भाजपचे दीपक शिंदे यांनी बाजी मारली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या तालुक्यातील प्रभावक्षेत्रात अनेक मोठ्या ग्रामपंचायतीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्दमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलने भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पॅनलचा पराभव केला.

चला हवा येऊ द्याः ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. हा कौल ठाकरे सरकारच्या बाजूने आहे. तो मान्य करा नाही तर राज्यातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआयला हाताशी धरून राजकीय क्रांती घडवता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला हवा येऊ द्या, अशी घणाघाती टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. ठाकरे सरकार लोकांच्या मनाला भिडले आहे. उद्धव ठाकरे यांचे विनम्र वागणे लोकांना भावले आहे. ग्रामपंचायत निकालांचा तोच अर्थ आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा